स्थानिक घोडेस्वाराने घेतली दहशतवाद्यांशी झुंज   

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून वेचून मारले. यामध्ये स्थानिक मुस्लिम नागरिक सय्यद आदिल हुसैन शाह याचाही समावेश होता. पहलगामच्या बेस कॅम्पवरून पर्यटकांना घोड्यावरून बैसरण पर्वत रांगामधील पॉइंट दाखविण्याचे काम तो करत होता. मंगळवारी दुपारी जेव्हा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, तेव्हा तो थेट दहशतवाद्यांशी भिडला. पर्यटकांना वाचविण्यासाठी त्याने दहशतवाद्याची बंदुक हिसकावली. मात्र, या हल्ल्यात त्याचाही बळी गेला. 
 
आदिल हुसैन हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता व्यक्ती होता. पर्यटकांना घोड्यावरून नेण्याचे काम तो करत होता. आदिलच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आदिलचे वडील सय्यद हैदर शाह म्हणाले, माझा मुलगा मंगळवारी पर्यटकांना घेऊन टेकडीवर गेला होता. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तातडीने मुलाला फोन लावला, तर त्याचा फोन बंद होता. त्यानंतर ४ वाजून ४० मिनिटांनी त्याचा फोन सुरू झाला; पण समोरून कोणीही उत्तर देत नव्हते. त्यामुळे आम्ही पोलिस ठाणे गाठले. तिथे आदिल जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रूग्णालयात गेल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. 
 
मृत आदिलच्या आईने रडत रडत आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, ’माझा मुलगा निर्दोष होता. त्याला का मारले? घरात सगळे लहान आहेत. तो मोठा होता आणि घरात तोच कमावता व्यक्ती होता. पर्यटकांना घोड्यावरून ने-आण करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. त्याचे लग्न झाले आहे.  त्याच्याशिवाय आमचे भविष्य काय? याची कल्पनाही करवत नाही, आम्हाला न्याय हवा आहे. 
 

Related Articles